Breaking News
Loading...
Thursday, 13 May 2010

Info Post
किती किती स्वप्ने पाहिली होती मी..
तू आलास की..
काही व्यक्त काही अव्यक्त
बोलत बसायचं..
कधी हसायचं तर कधी
उगाचच रडायचं..
काही असं बोलायचं तर
तसं बोलायचं काही..
तू निघतो म्हणशील तेव्हा..
तुला जाऊच द्यायचा नाही..





तू आलास अन
लगेच निघालासही..

या अपुऱ्या क्षणांत मग
भेटायचं राहूनच  गेलं..
ओठांवर साचून राहिले शब्द,
बोलायचं राहूनच गेलं..
वाटलं,पकडावा तुझा हात
अन चिडावं थोडं..
"तुझं हे नेहमीचेच" म्हणत,
रडावं थोडं..
पण,
बुद्धी भलतीच विचारी..
म्हणाली..
"असं का करतात वेडे..?
निरोप देताना हसावे थोडे.."
मग,दाटून आलेला गळा..
तरीही घातला बांध मनाला
हसत निरोप देत ,
हालवत राहिले हाताला..
तू दूर जाईपर्यंत हसू
मावळू दिलं नाही..
डोळ्यांतले पाणी पापण्यांनाही
कळू दिलं नाही..

अस्वस्थ मनाने,
परत माघारी फ़िरले तेव्हा..
अंगणभर..
प्राजक्ताचा सडा पडला होता..
तू निघताना..
तोही बहुधा..
मुक्यानेच रडला होता..


0 comments:

Post a Comment